महिलांसाठी साधना सखी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

महिलांसाठी साधना सखी महिला महासंघाचा स्तुत्य उपक्रम – काका कोयटे, अध्यक्ष
शिरूर : शॉपिंग फेस्टिवल व खाद्य जत्रा या उपक्रमामुळे शिरूर तालुक्यातील महिलांच्या व्यवसायाला बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी फायदा होईल. साधना महिला नागरी सहकारी पतसंस्था संचलित साधना सखी महिला महासंघ राबवित असलेला हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असून घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना आर्थिक स्थिरता प्राप्त करून देणारा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी काढले.

जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या साधना महिला नागरी सहकारी पतसंस्था संचलित साधना सखी महिला महासंघाच्या वतीने आयोजित शॉपिंग फेस्टिवल व खाद्य जत्रा २०२५ या कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमाला राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रसंगी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना काका कोयटे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचलित सहकार उद्यमी अंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील समता पतसंस्थेच्या सौजन्याने महिला बचत गटातील महिलांना समता सहकार उद्योग मंदिराच्या माध्यमातून व्यवसाय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या मंदिरात अगरबत्ती, वाती, मेणबत्ती तयार करण्याची मशिने उपलब्ध करून दिली आहे. बचत गटातील महिला त्यावर काम करून संसाराला हातभार लावण्यासाठी पैसे मिळवून आर्थिक मदत करत असतात. साधना सखी महिला महासंघाच्या महिलांनी समता सहकार मंदिराला अवश्य भेट देऊन घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांसोबत शिरूर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांनाही राज्य पतसंस्था फेडरेशन आणि साधना महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटाद्वारा विविध व्यवसाय व उत्पादित वस्तूला विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल.

या कार्यक्रमाचे उद्घाटन शिरूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केंजळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच शिरूर हवेली चे माजी आमदार ॲड. अशोक बापू पवार यांनी देखील सदिच्छा भेट दिली होती. प्रसंगी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे व समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते साधना सखी महिला महासंघाकडून माझं घर या वयोवृद्ध लोकांसाठी उभारल्या गेलेल्या वास्तूसाठी ५ हजार रुपयांची देणगी देण्यात आली. तसेच साधना सखी आयकॉन पुरस्कार २०२५ डॉ.सरोज कुलकर्णी आणि साधना सखी अन्नपूर्णा पुरस्कार २०२५ सौ. रेश्मा धुमाळ यांना कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते देण्यात आला.

या शॉपिंग फेस्टिवल मध्ये ज्वेलरी, कपडे, सौंदर्य प्रसाधने, पर्स, लाकडी वस्तू, साड्या, उन्हाळी पदार्थ, दिवाळी पदार्थ, गुळपट्टी, मेहंदी, औषधी वनस्पती, आयुर्वेदिक प्रोडक्ट्स, मतिमंद मुलांनी बनवलेल्या वस्तू, हेअर कट तसेच सुप्रसिद्ध सौंदर्य तज्ञ डॉ.राहुल फाटे यांचे प्रॉडक्ट यांनी सहभाग नोंदवलेला होता. तसेच खाद्य जत्रेत मोमोज, पाव भाजी, पाणी पुरी, थाली पीठ, कोथिंबीर वडी, मंचुरियन, चायनीज आदी खाद्य पदार्थांचा उपस्थितांनी आस्वाद घेतला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक साधना सखी महिला महासंघाच्या अध्यक्षा व साधना महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापक चेअरमन सौ.साधना शितोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयश्री थेरूरकर, अनुपमा जोशी, अंजली भाजीभाकरे, सत्वशीला पाटील, वैशाली पाटील, शितल शर्मा, पल्लवी शहा, नीता ढोरजकर, सुवर्णा शिंदे, सुवर्णा पवार, सोनल गायके, स्नेहल वाखारे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. ज्योती वाळके यांनी केले. उपस्थितांचे आभार सौ. गीताराणी आढाव यांनी मानले.



