Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय

सहकारी पतसंस्थांचा ठेव विमा संरक्षणाचा मुद्दा लोकसभेत खासदार राजाभाऊ वाजे मांडणार

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 1 2 3 3

सहकारी पतसंस्थांचा ठेव विमा संरक्षणाचा मुद्दा लोकसभेत खासदार राजाभाऊ वाजे मांडणार

सिन्नर : सहकारी पतसंस्थांना ठेव विमा संरक्षण मिळणे अत्यंत गरजेचे असून त्याचप्रमाणे यूपीआयसाठी डायरेक्ट ऍक्सेस, सिबिलमध्ये समावेश यांसारखे महत्त्वाचे प्रश्न आपण लोकसभेत ठामपणे मांडणार असल्याची ग्वाही नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, सहकार भारती, नाशिक, सहकारी संस्था कार्यालय सिन्नर आणि आविष्कार सहकार प्रशिक्षण व संशोधन केंद्र यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. सिन्नर येथील हॉटेल श्रीनाम येथे हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. अध्यक्षीय मनोगतात काका कोयटे यांनी राज्यातील सहकारी पतसंस्थांचे विविध प्रश्न खासदार वाजे यांच्या समोर मांडले. त्यावर खासदार वाजे यांनी तातडीने दखल घेत लोकसभेमध्ये या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवू, असे आश्वासन दिले.

कार्यक्रमास खासदार राजाभाऊ वाजे उद्घाटक म्हणून, राज्य फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष नारायण वाजे स्वागताध्यक्ष म्हणून, एस.एस.के. धनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन संग्राम कातकडे तसेच सहाय्यक निबंधक संजय गीते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार वाजे म्हणाले की, पतसंस्थांसाठी ठेव विमा संरक्षण, यूपीआयला थेट परवानगी, तसेच सिबिलमध्ये समावेश या मुद्द्यांवर आपण दिल्ली येथे पाठपुरावा करू. “आपण सर्वांनी या प्रश्नांसाठी एकत्र येऊन दिल्लीला या; मी लोकसभेत तुमच्या हक्कासाठी आवाज उठवेन,” असे त्यांनी स्पष्ट केले.

काका कोयटे यांनी देखील या प्रसंगी “सहकार धोरणातील बदल आणि पतसंस्थांचे भविष्य” या विषयावर मार्गदर्शन केले. बदलत्या सहकार धोरणाच्या पार्श्वभूमीवर पतसंस्थांनी पारदर्शकता, शिस्त आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास त्यांचे भविष्य अधिक सक्षम व उज्ज्वल राहील, असे त्यांनी सांगितले. नवीन धोरणामुळे उत्तरदायित्व आणि नियमन अधिक कडक झाले असून, सक्षम नेतृत्व, सुयोग्य निधी व्यवस्थापन, कायदेशीर तरतुदींचे पालन आणि सदस्यकेंद्री दृष्टिकोन अंगीकारणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. बदलांना घाबरून न जाता संधी म्हणून स्वीकारल्यास सहकार चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांना सिन्नर तालुक्यातील डुबेरेसारख्या ४ ते ५ हजार लोकवस्तीच्या गावात कार्यरत असलेली श्रीमंत थोरले बाजीराव सहकारी पतसंस्था ही अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी काका कोयटे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील पतसंस्था उत्कृष्ट कामकाज कसे करतात याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य फेडरेशनचे उपकार्याध्यक्ष नारायणराव वाजे यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी नाशिक जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात, ज्यामुळे आर्थिक शिस्त व भक्कमपणा निर्माण होण्यास मदत होते.

या दोन दिवसीय कार्यशाळेत सहकार धोरणातील बदल, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम १३८, महाराष्ट्र सहकारी कायदा कलम १५६, नेतृत्व विकास, गुंतवणूक व निधी व्यवस्थापन, नवीन कर्जधोरण व कर्जमर्यादा, नियामक मंडळाची व्याप्ती, कुटुंब व्यवस्थापन तसेच के.वाय.सी., सी.आर.आर., एस.एल.आर. व वार्षिक अहवाल प्रगटीकरण आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

उपस्थित मान्यवरांनी अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे पतसंस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कायदेशीर, प्रशासकीय व व्यवस्थापन कौशल्ये विकसित करण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले. बदलत्या सहकार व्यवस्थेत मार्गदर्शनपर उपक्रमांची गरज अधिक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे