Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

“सहकार ज्यांच्या रक्तात आहे ते उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद जाधव” – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 1 3 7 8

“सहकार ज्यांच्या रक्तात आहे ते उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद जाधव” – काका कोयटे, अध्यक्ष

पालघर : पालघर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचा रौप्य महोत्सवी सोहळा तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व पालघर जिल्हा फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ व १३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित प्रशिक्षण शिबिर उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालघर जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पालघर जिल्ह्यातील वसई येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना काका कोयटे म्हणाले, “सहकार ज्यांच्या रक्तात आहे असे उत्साही व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद जाधव. राज्यातील सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्यातील ३५ जिल्हा फेडरेशन कार्यरत आहेत. त्यामध्ये पालघर जिल्हा फेडरेशन अध्यक्ष शरद जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या २४ वर्षापासून अग्रक्रमाने कार्य करत आहे. राज्य फेडरेशनचे सहसचिव म्हणून ही ते कार्यरत आहे.

पालघर जिल्ह्यात सहकारी पतसंस्थांची संख्या तुलनेने कमी असतानाही ही चळवळ जिवंत ठेवण्याचे मोठे श्रेय जिल्हा फेडरेशनचे संस्थापक पीटर मार्यान लोपीस व पदाधिकारी यांना देखील जाते, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पालघर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व राज्य फेडरेशनचे सहसचिव शरद जाधव यांनी केले. प्रसंगी पालघर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ९३ वर्षीय प्रभाकर गोपाळ घरत यांचा सत्कार करण्यात आला.

“सहकार कायद्यात बदल” या विषयावर बोलताना काका कोयटे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सहकारी पतसंस्थांचे म्हणणे ऐकून ते सहकार कायदा बदल समितीच्या माध्यमातून राज्य व केंद्र शासनाकडे मांडले जाणार आहे. विशेषतः पतसंस्थांच्या थकबाकीदारांकडून थकबाकी वसुलीसाठी सिक्युरिटी लायझेशन लागू करण्याची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. “आपला सर्वांचा प्रतिनिधी म्हणून समितीत आपल्या सूचना आणि विचार पोहोचवण्याची जबाबदारी मी पार पाडेन,” अशी ग्वाही त्यांनी प्रसंगी दिली.

यावेळी जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णी म्हणाले की, पालघर जिल्ह्यात सहकार चळवळ सक्षमपणे वाढत आहे. एका जिल्ह्यात तीन शेड्युल्ड को-ऑपरेटिव्ह बँका कार्यरत असल्यामुळे सहकारी पतसंस्थांना प्रगतीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. त्या दृष्टीने सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

काका कोयटे यांनी सहकार कायद्यात आवश्यक बदलांवर सविस्तर विवेचन केले असता उपस्थित संचालक, अधिकारी व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत संमती दर्शवली. रौप्य महोत्सवी सोहळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या वेळी पालघर जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष मॅकलस घोन्सालवीस, उपकार्याध्यक्ष अरुण जाधव, सरचिटणीस अल्बर्ट अथाईड, सहचिटणीस सुहास राऊत, खजिनदार शांतीयोग डाबरे, संचालक प्रकाश भोईर, सौ.नबिला शेख, व्हॅलेरियन घोन्सालवीस, प्रकाश पाटील आदींसह तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष संचालक अधिकारी व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 3 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे