क्रेडिट सोसायटी समिट २०२६ मध्ये सहकार कायद्यात अपेक्षित बदलांवर काका कोयटे यांचे सखोल मार्गदर्शन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


क्रेडिट सोसायटी समिट २०२६ मध्ये सहकार कायद्यात अपेक्षित बदलांवर काका कोयटे यांचे सखोल मार्गदर्शन

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली येथील सीआरईएसटी इन्फो मीडिया आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व मॅनेजर यांच्यासाठी क्रेडिट सोसायटी समिट २०२६ या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या समिटमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सहकार कायद्यात अपेक्षित बदल या विषयावर सविस्तर व दिशादर्शक मार्गदर्शन केले.

काका कोयटे यांनी आपल्या भाषणात बदलत्या आर्थिक, तांत्रिक व नियामक वातावरणात सहकारी पतसंस्थांनी काळानुरूप बदल स्वीकारणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले. सहकार कायद्यात सुधारणा करताना पारदर्शकता, सभासदांचे हित, संस्थांची स्वायत्तता व आर्थिक शिस्त यांना प्राधान्य दिले गेले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल व्यवहार, जोखीम व्यवस्थापन, लेखापरीक्षण प्रणाली तसेच नियामक सुलभता या बाबींवर कायद्यात ठोस तरतुदी अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे, बुलढाणा अर्बन बँकचे संस्थापक राधेश्याम चांडक, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.शांतीलाल शिंगी, सहकार भारतीचे संजय पाचपोरे, देवगिरी बँक अध्यक्ष व छत्रपती संभाजी नगर शहर जिल्हाध्यक्ष (बीजेपी) किशोर शितोळे, चिखली नगरपालिका नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, सीआरईएसटी इन्फो मीडियाचे एम.डी. गौतम नवीन, रिचा वशिष्ठ आदी मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या समिटला उपस्थित राहिले.

कार्यक्रमातून सहकारी क्षेत्रासमोरील आव्हाने, संधी आणि आगामी धोरणात्मक दिशा यावर सखोल चर्चा झाली. काका कोयटे यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांना कायदेशीर बदलांची स्पष्ट दिशा व भविष्यातील कार्यपद्धतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले, अशी भावना सहभागी प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच काका कोयटे यांनी सहकार कायद्यात अपेक्षित बदल या विषयाच्या अनुषंगाने केलेल्या सूचनांना उपस्थितांनी हात वर करून पाठिंबा देत त्या सुचनांप्रमाणे कायद्यात बदल करण्यात यावे.असा ठराव करण्यात आला



