मॅफकॉसचा दीपस्तंभ पुरस्कार सोहळा व विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


मॅफकॉसचा दीपस्तंभ पुरस्कार सोहळा व विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न
नसरापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन (मॅफकॉस) यांच्या वतीने दरवर्षी साजरा केला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा तसेच विशेष वसुली अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण असा एकत्रित कार्यक्रम नसरापूर येथील आर्यन रिव्हर वूड रिसॉर्ट येथे उत्साहात संपन्न झाला. सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री मा.उदय जोशी यांच्या शुभ हस्ते दीपस्तंभ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

प्रसंगी राज्यातील सहकारी पतसंस्थांसमोरील सध्याच्या आव्हानांवर, बदलत्या आर्थिक परिस्थितीवर तसेच सहकारी कायद्यात करावयाच्या आवश्यक बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली. राज्य फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सहकारी कायद्यात कोणकोणते बदल करणे अपेक्षित आहे याचे सविस्तर सादरीकरण केले. पतसंस्था अधिक सक्षम, पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा त्यांनी स्पष्ट केल्या. त्यांच्या सादरीकरणास उपस्थित सर्व पतसंस्थांनी एक मताने मान्यता दिली.

दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करताना मा.उदय जोशी यांनी राज्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी सर्व निकषांचे पालन करून सहकारी पतसंस्था चळवळीचे नाव उंचावावे, असे आवाहन केले. सहकार ही केवळ आर्थिक व्यवहाराची व्यवस्था नसून सामाजिक बांधिलकीची चळवळ आहे, असे सांगत त्यांनी पारदर्शकता आणि जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याचे आवाहन केले.

याच कार्यक्रमात विशेष वसुली अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सत्रही पार पडले. विविध व्याख्यात्यांनी वसुली प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदी, अंमलबजावणीतील अडचणी आणि प्रभावी उपाययोजना यांवर मार्गदर्शन केले. राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी वसुली अधिकाऱ्यांना संबोधित करताना, “वसुली करणे हे पुण्याचे काम आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून पतसंस्था चळवळ सुदृढ होण्यासाठी वसुली कायदेशीर परंतु कठोरपणे केली पाहिजे,” असे ठामपणे सांगितले. तसेच सर्व वसुली अधिकाऱ्यांची संघटना असणे गरजेचे असून प्रत्येक जिल्ह्यात वसुली अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. वसुली अधिकाऱ्यांच्या वसुली कायद्यात कोणते बदल सुचवायचे यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व प्रतिनिधींचे स्वागत फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी संचालक सुरेखा लवांडे यांनी केले. सुत्रसंचालन राज्य फेडरेशन संचालक आणि प्रशिक्षण समिती प्रमुख भास्कर बांगर व वासुदेव काळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संचालक डॉ. रवींद्र भोसले यांनी मानले. उपस्थित प्रतिनिधींनी राज्य फेडरेशनने केलेल्या आदरातिथ्याबद्दल तसेच दीपस्तंभ पुरस्कार प्रदान केल्याबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.

एकूणच, दीपस्तंभ पुरस्कार सोहळा आणि विशेष प्रशिक्षण उपक्रमामुळे सहकारी पतसंस्था चळवळीला नवचैतन्य व बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या कार्यक्रमातून पतसंस्थांमध्ये एकात्मता, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.



