जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळ पुन्हा अग्रभागी आणण्याचा संकल्प – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळ पुन्हा अग्रभागी आणण्याचा संकल्प – काका कोयटे, अध्यक्ष

जळगाव : ९० च्या दशकात महाराष्ट्रात अग्रभागी असलेली जळगाव जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळ पुन्हा सक्षम आणि प्रभावी करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त जळगाव जिल्हा नागरी व पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय हॉल येथे पार पडली. यावेळी राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यशाळेच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संस्थापक व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक रविंद्र प्रल्हादराव पाटील होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळगाव जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष शशिकांत भास्करराव साळुंखे यांनी केले. ते म्हणाले की, एकेकाळी जळगाव जिल्हा फेडरेशनच्या ८०० हून अधिक सहकारी पतसंस्था सभासद होत्या. सध्या ती संख्या ३०० वर आली असली तरी त्यांना जिल्हा फेडरेशन पाठबळ देत आहे. राज्य फेडरेशनच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यास आमचा पुन्हा पूर्वीचे वैभव परत आणण्याचा प्रयत्न राहील.

अध्यक्षीय भाषणात रविंद्र पाटील म्हणाले की, १९८९ साली महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर या राज्य फेडरेशन वर काका गेली अनेक वर्षापासून अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. मी देखील राज्य व जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीत काम करत असतो. परंतु राजकारणामुळे माझे दुर्लक्ष झाले होते. राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळ सक्षम व सुदृढ बनविण्यात काकांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या कामाकडे माझे बारकाईने लक्ष असते. त्यामुळे मी पुन्हा जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळ मजबूत बनविण्याकडे लक्ष देणार आहे.

या प्रसंगी जळगाव जिल्हा विशेष लेखापरीक्षक के. जे. पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दादासाहेब देशमुख, जिल्हा अर्बन बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहासभाई गुजराथी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनचे एसआरओ जी.बी. बागुल यांनी केले तर आभार जिल्हा फेडरेशन व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी मानले.



