“सहकाराचा पाया विश्वासावरच मजबूत ; बदलत्या काळात शिस्त, पारदर्शकता व प्रशिक्षण आवश्यक” – काका कोयटे, अध्यक्ष
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


“सहकाराचा पाया विश्वासावरच मजबूत ; बदलत्या काळात शिस्त, पारदर्शकता व प्रशिक्षण आवश्यक” – काका कोयटे, अध्यक्ष
सहकार कायद्यात बदल सुचविण्यासाठी माझी निवड झाल्यानंतर राज्यव्यापी दौऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ यवतमाळ जिल्ह्यातील या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला आहे, — काका कोयटे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन
आर्णी : “सहकार हा विश्वासावर उभा असलेला स्तंभ आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत पतसंस्थांनी केवळ व्यवहारांपुरते मर्यादित न राहता व्यवस्थापनातील शिस्त, पारदर्शकता आणि कायद्याचे काटेकोर पालन यावर भर देणे अत्यावश्यक आहे. अधिकारी, कर्मचारी व संचालक यांचे नियमित प्रशिक्षण हेच सहकाराच्या स्थैर्याचे खरे बळ आहे,” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यवतमाळ आणि जिल्हा पगारदार व नागरी सहकारी पतसंस्थांचा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे काका कोयटे यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, “अफवा, वाढती स्पर्धा आणि तंत्रज्ञानाच्या वेगामुळे घाबरून न जाता योग्य माहिती, सक्षम व्यवस्थापन आणि सभासदांशी सातत्यपूर्ण संवाद ठेवला, तर सहकारी पतसंस्था अधिक सक्षम व विश्वासार्ह बनतील.”

तसेच सहकार कायद्यात काळानुरूप अमुलाग्र बदल होणे गरजेचे असल्याचे नमूद करताना त्यांनी सांगितले की, सहकारी पतसंस्थांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना वसुली प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी कायदा कलम १०१ प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे सरफेसी कायदाही सहकारी पतसंस्थांना लागू व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पतसंस्थांसमोरील सध्याची आव्हाने या विषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिबिरात पतसंस्थांचे व्यवस्थापन या विषयावर गोदावरी मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी मार्गदर्शन केले. तर अहिल्यानगर येथील व्याख्याते प्रशांत खोपटीकर यांनी वसुली तंत्र व मंत्र, कायदेशीर बाबी, लेखापरीक्षण आणि जोखीम व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षण शिबिरात यवतमाळ जिल्ह्यातील २२५ शिबिरार्थींनी सहभाग नोंदविला.

या वेळी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, राज्य फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, कोषाध्यक्ष दादाराव तुपकर, सहकार भारती यवतमाळ जिल्हाध्यक्ष शामकुमार लोखंडे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



