Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र व गुजरात मधील सहकारी पतसंस्थांनी जगासमोर आदर्श घालून द्यावा – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 4 2 4 0 7

महाराष्ट्र व गुजरात मधील सहकारी पतसंस्थांनी जगासमोर आदर्श घालून द्यावा – काका कोयटे, अध्यक्ष

अहमदाबाद : सहकार क्षेत्रात महाराष्ट्र व गुजरात ही दोन्ही राज्ये देशात अग्रस्थानी असून, पतसंस्था चळवळीच्या बळकटीसाठी या दोन्ही राज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. बदलत्या आर्थिक परिस्थितीत सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी परस्पर सहकार्य आणि समन्वयाची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांनी एकत्र येत सहकाराची ताकद अधिक प्रभावीपणे उभी करून महाराष्ट्र व गुजरात या दोन अग्रगण्य राज्यांतील सहकारी पतसंस्थांनी एकत्रितरित्या काम करून जगभरातील सहकार चळवळीसमोर आदर्श घालून द्यावा. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

अहमदाबाद येथे गुजरात राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित सहकारी पतसंस्थांच्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष घनश्यामभाई अमिन होते.या सहकार मेळाव्याचे उद्घाटन राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

काका कोयटे पुढे म्हणाले की, भारतातील सहकारी पतसंस्थांची चळवळ ही ऐतिहासिक असून, महाराष्ट्र व गुजरात एकत्र असताना मुंबई प्रांतात विठ्ठल लक्ष्मण कवठेकर यांनी ‘सहकारी मंडळ’ स्थापन करून या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आज ही चळवळ जागतिक पातळीवर आदर्श ठरत आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी एकत्र येत अधिक प्रभावीपणे काम करण्याची गरज आहे.

प्रास्ताविकात गुजरात फेडरेशनचे अध्यक्ष घनश्यामभाई अमिन यांनी सांगितले की, महाराष्ट्रात १६ हजारांहून अधिक, तर गुजरातमध्ये ६ हजारांपेक्षा अधिक सहकारी पतसंस्था कार्यरत आहेत. देशातील सर्वात मोठी सहकारी पतसंस्था चळवळ महाराष्ट्रात असून, तिचे नेतृत्व काका कोयटे यांच्याकडे असणे ही अभिमानाची बाब आहे. तसेच केंद्रीय सहकार मंत्री हे गुजरातचे सुपुत्र असल्याने, दोन्ही राज्यांनी एकत्रितपणे त्यांच्याकडे जाऊन सहकारी पतसंस्थांचे प्रश्न मांडले तर त्यांचे प्रभावी निराकरण होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी दुष्यंतसिंग वाघेला यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, महाराष्ट्र व गुजरातमधील पतसंस्थांनी परस्परांच्या कार्यपद्धती, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे आदान-प्रदान करणे गरजेचे आहे. “ज्याच्याकडे जे उत्तम आहे, ते दुसऱ्याने आत्मसात करावे,” या तत्त्वावर दोन्ही राज्यांनी सहकार्य वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून सदस्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी संयुक्त उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या वेळी गुजरात राज्य को – ऑप. बँकेचे महाव्यवस्थापक मनोजभाई पटेल, गुजरात को- ऑप. युनियन उपाध्यक्ष रविंद्रसिंह ए. राणा, सचिव भाईखाभाई झेड. पटेल, निवृत्त संयुक्त निबंधक जे. जे. शहा, गुजरात फेडरेशनचे उपाध्यक्ष जिवराजभाई गोधानी व संचालक आणि गुजरात राज्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 4 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे