Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

गौतम बलसाने यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे पतसंस्था चळवळीला चांगले दिवस येतील – काका कोयटे, अध्यक्ष

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

गौतम बलसाने यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे पतसंस्था चळवळीला चांगले दिवस येतील – काका कोयटे, अध्यक्ष

मलकापूर : सहकारी पतसंस्थांची चळवळ सुदृढ व सक्षम बनविणे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व सहकार खाते हातात हात घालून काम करत असते. याचा प्रत्यय मलकापूर अर्बन मध्ये अडकलेल्या ठेवी परत मिळविण्याविषयी अवसायक गौतम बलसाने यांच्या कार्य तत्परतेमुळे आला आहे. सहकार खात्याच्या गौतम बलसाने यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे सहकारी पतसंस्था चळवळीला अधिक चांगले दिवस येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी सांगितले.

मलकापूर अर्बन को – ऑप. बँकेच्या ठेवीदारांना दिलासा देणाऱ्या अवसायक गौतम बलसाने यांच्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व मलकापूर अर्बन ठेवीदार कृती समिती यांच्यावतीने राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम बलसाने यांचा सत्कार समारंभ छत्रपती संभाजीनगर येथील वर्धमान नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. त्या वेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील तब्बल १२० सहकारी पतसंस्थांचे ३५० कोटी रुपये मलकापूर अर्बन को – ऑप. बँकेत अडकून पडले होते. ही रक्कम परत मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि मलकापूर अर्बन ठेवीदार कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा तसेच मुंबईतील आझाद मैदान येथे अनेक आंदोलने करण्यात आली.

रिझर्व्ह बँकेने आदेश दिल्यानंतरही अवसायकाची नेमणूक दीर्घकाळ झाली नाही. यामुळे ठेवीदारांना न्याय मिळावा यासाठी उच्च न्यायालयात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व मलकापुर अर्बन ठेवीदार कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून अवसायकाची नेमणूक केली. या प्रकरणात मलकापूर अर्बनचे तत्कालीन चेअरमन चैनसुख संचेती यांच्या दबावामुळे ४ अवसायकांनी राजीनामे दिले. काही दिवसांपूर्वी अवसायक खरात यांना राज्य फेडरेशन व ठेवीदार कृती समितीच्या वतीने घेराव घातला असता त्यांनी ठेवीदारांना ५० टक्के परत फेडीचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र दबावामुळे त्यांनीही पद सोडले.

तद नंतर अवसायक गौतम बलसाने यांनी पदभार स्वीकारताच ठेवीदारांच्या हिताचा विचार करून ५० टक्के ठेवी परत करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रत्यक्ष कार्यवाही देखील सुरू झाली आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मलकापूर अर्बन ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, सचिव सुदर्शन भालेराव, सदस्य राजाभाऊ देशमुख, गोविंदप्रसाद अग्रवाल व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी मलकापूर अर्बनमधील ठेवी ठेवीदारांना परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे सहकार आयुक्त दीपकजी तावरे यांचे देखील विशेष आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आबासाहेब देशमुख यांनी केले.

या निर्णयामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या ठेवीदारांना दिलासा मिळाला असून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि मलकापूर अर्बन ठेवीदार कृती समितीचे हे यश असल्याचे मानले जात आहे.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे