पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु; सहकार चळवळीला नवी दिशा
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे आणि नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलगुरू संजय सोनवणे यांच्या समवेत बैठकीस उपस्थित अभ्यासक्रम समितीचे सर्व सदस्य

पतसंस्था कर्मचाऱ्यांसाठी पदविका अभ्यासक्रम लवकरच सुरु; सहकार चळवळीला नवी दिशा

नाशिक : महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी विशेष पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु संजयजी सोनवणे यांनी नुकतीच केली. हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या सहकार्याने व मान्यतेने राबविण्यात येणार आहे.
युनोने सन २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले असून त्या पार्श्वभूमीवर हा अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक पतसंस्था अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेता हा अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या व्यवस्थापन व वाणिज्य विभागप्रमुख डॉ. सुरेंद्र पाटोळे यांनी सांगितले.
या कोर्ससंबंधी अधिक माहिती देताना फेडरेशनच्या संचालिका ॲड. अंजलीताई पाटील म्हणाल्या, “सध्या अनेक कर्मचारी कोणतेही औपचारिक बँकिंग प्रशिक्षण न घेता पतसंस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे सहकार विषयक ज्ञान प्राप्त व्हावे, या उद्देशाने हा अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. १२ वी उत्तीर्ण असलेले अधिकारी व कर्मचारी या कोर्ससाठी पात्र असतील.”
यापुढे हा अभ्यासक्रम पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्याची पतसंस्थेमध्ये नियुक्ती किंवा बढती देणे शक्य होणार नाही, असेही त्या म्हणाल्या. यासाठी सहकार खात्याशी चर्चा करून आवश्यक परिपत्रक काढण्याचा प्रयत्न फेडरेशन करत आहे. या उपक्रमामुळे पतसंस्था चळवळीत शिस्त आणि व्यावसायिकता येईल, असा विश्वास फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांनी व्यक्त केला.
अभ्यासक्रमाच्या अंतिम रूपासाठी माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांचे मार्गदर्शन लाभणार असून त्यांनी हा अभ्यासक्रम परिपूर्ण आणि उपयुक्त व्हावा यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे सांगितले.
या अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रम समिती प्रमुख डॉ. सुरेंद्र पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत सहकार खात्याचे अप्पर निबंधक तानाजी कवडे, नेटविन सॉफ्टवेअरचे संचालक उत्तम घाडगे, मार्केटिंग अधिकारी मसुद अत्तार, साताऱ्याचे प्राचार्य डॉ. रविंद्र भोसले, अलिबागचे अभिजीत पाटील, गोदावरी अर्बनचे धनंजय तांबेकर, सीए अनिरुद्ध जाजू, संचालक भास्कर बांगर आणि कर सल्लागार स्वप्नील साखरे यांचा समावेश आहे.
हा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सहकारी चळवळीला नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.



