Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांना बळकट करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार – राजन पाटील यांची ग्वाही

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकारी पतसंस्थांना बळकट करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार – राजन पाटील यांची ग्वाही

तुळजापूर : “सहकारी पतसंस्थांना सबळ करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असून, केंद्र व राज्य सरकारच्या सहकार विभागाशी सातत्याने संवाद साधून पतसंस्थांना भेडसावणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मी ठोस पावले उचलणार आहे,” अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आयोजित ‘पतसंस्था सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिरा’त ते तुळजापूर येथे बोलत होते. यावेळी राज्य फेडरेशनतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

राजन पाटील पुढे म्हणाले की, पतसंस्थांच्या हितासाठी नवीन योजना, सवलती व प्रशिक्षण कार्यक्रम आवश्यक असून यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. अंशदानासंबंधीचा प्रश्नही सहकार खात्यासमोर मांडण्यात येणार आहे. पतसंस्थांना विविध व्यवसायांची संधी मिळावी यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे होते. आपल्या भाषणात त्यांनी पतसंस्था या समाजाच्या विश्वासाचे आणि आर्थिक सक्षमीकरणाचे केंद्र असल्याचे सांगून, आधुनिक व्यवस्थापन व पारदर्शकतेचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

तसेच पतसंस्था ग्रामीण व निमशहरी भागातील आर्थिक आधारस्तंभ असून, त्यांना शाश्वत व्यवस्थापन, कायदेशीर समज, कर्ज वाटप, वसुली प्रक्रिया व नियामक बाबींमध्ये सक्षम करणे गरजेचे आहे. या उद्देशानेच हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले, अशी माहिती काका कोयटे यांनी दिली.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्रवीण फडणीस (विभागीय सहनिबंधक, लातूर विभाग) व मा. पांडुरंग साठे (जिल्हा उपनिबंधक, धाराशिव) यांनी सहकार कायदा, लेखापरीक्षण, कर्जवाटप, वसुलीचे कायदेशीर पर्याय याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

या वेळी नियामक मंडळ सदस्य म्हणून निवड झालेल्या मा. हनुमंत भुसारे यांचा ही विशेष सत्कार झाला. त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्था-शासन समन्वय, तांत्रिक सुधारणा व कायदे सुलभ करण्याची भूमिका स्पष्ट केली.

शिबिरात सहभागी प्रतिनिधींना सहकार धोरण, कायदेशीर तरतुदी, व्यवस्थापन, तांत्रिक अडचणी व त्यांच्या उपायांवर प्रात्यक्षिक स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. हे शिबिर व्यवहारात उपयोगी पडणारे ठरले.

कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन मंगलनाथ मल्टीस्टेटचे व्यवस्थापकीय संचालक ॲड. रविंद्र कानडे यांनी केले. या प्रशिक्षण शिबिरात धाराशिव जिल्ह्यातील रुपामाता पतसंस्था अध्यक्ष व्यंकटराव गुंड, महात्मा बसवेश्वर पतसंस्था अध्यक्ष श्रीकांत साखरे, तुळजाभवानी पतसंस्था अध्यक्ष चंद्रकांत शेजुळ, तुळजाई पतसंस्था अध्यक्ष राजेंद्र देशमाने, जनहित पतसंस्था अध्यक्ष संतोष तौर, धाराशिव जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष सतीश दंडनाईक आदींसह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचा समारोप राज्य फेडरेशनच्या कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी आभार प्रदर्शन करून केला.

1.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे