अनुराधा बँकेच्या नेत्रदीपक प्रगतीने भारावलो : काका कोयटे, अध्यक्ष ; वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सहकार मेळावा व ग्राहक संमेलनाचे राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उद्घाटन
कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे


अनुराधा बँकेच्या नेत्रदीपक प्रगतीने भारावलो : काका कोयटे, अध्यक्ष

वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सहकार मेळावा व ग्राहक संमेलनाचे राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उद्घाटन

चिखली : कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी स्थापन केलेल्या अनुराधा अर्बन को-ऑप.बँकेने २५ वर्षांचा यशस्वी टप्पा ओलांडला आहे. “शून्य टक्के थकीत, १००% विश्वास” या ब्रीदवाक्यासह बँकेने रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फायनान्स पोलीस साऊंड वेल मॅनेजमेंट बँक यादीत अनुराधा बँकेचा समावेश होणे ही राज्यातील पतसंस्थांच्या चळवळीसाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.

अनुराधा बँकेच्या वतीने कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे जयंती व वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त सहकार संमेलन व ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते झाले. यावेळी सत्यजित अर्बनचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर, राजर्षी शाहू अर्बनचे अध्यक्ष संदीप शेळके, स्वातीताई वाकेकर, सुर्दशनजी भालेराव, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष दिपक देशमाने, बँकेचे उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ यादव, सीईओ नितीन गायके आदी मान्यवर उपस्थित होते. त्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, सहकार आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांना न्याय देत राहुल भाऊ बोंद्रे यांनी अनुराधा बँकेला सक्षम व आर्थिक स्थैर्य दिले आहे. अनुराधा व हिरकणी ही यशस्वी बँकिंगची उदाहरणे आहेत. चिखली परिसरातील नागरिकांनी या बँकांमध्ये ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रातील बँका व सहकारी क्षेत्रातील पतसंस्था यांनी हातात हात घालून महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बँकेचे अध्यक्ष राहुल भाऊ बोंद्रे म्हणाले की, कमी व्याजदर ठेवूनही अनुराधा बँके च्या ठेवी १२२ कोटींवर पोहोचले आहेत आणि सातत्याने वाढत आहे. अनेक तक्रारींच्या चौकशा झाल्या, चार वेगवेगळ्या समित्या नेमल्या गेल्या, मात्र सर्वच समित्यांनी बँकेला क्लीन चीट दिली. अनुराधा बँकेची पहिली शाखा आता मेहकर येथे सुरू होत असून आगामी काळात ५ जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्राने बँक अधिक उंच भरारी घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्यजित अर्बनचे अध्यक्ष श्यामभाऊ उमाळकर यांनी सांगितले की अनुराधा परिवार सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रणी असून महिला सक्षमीकरणात राहुल भाऊ व वृषालीताई बोंद्रे व्यापक कार्य करतात. राजर्षी शाहू अर्बनचे अध्यक्ष संदीप शेळके म्हणाले की, कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांनी निर्माण केलेला वारसा जोपासताना राहुल भाऊंनी संकटांचा सामना करून सहकार व राजकारणात विचाराची दिशा निवडली आहे.

या कार्यक्रमाला सुधाभाऊ धमक, कुणाल भाऊ बोंद्रे, रामभाऊ जाधव, अशोकराव पडघन, डॉ. सत्येंद्र भुसारी, प्राचार्य निलेश गावंडे, सचिन बोंद्रे, हरकलाल शेठ, मनोज लाहूडकर, समाधान सुपेकर, विष्णू पाटील कुलसंदर यांच्यासह चिखली व परिसरातील पतसंस्थांचे अध्यक्ष, संचालक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, विविध सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



