Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

सहकारी पतसंस्थांना नवसंजीवनी देणार मावळमधील विचार मंथन शिबिर

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 3 9 2 7 1

सहकारी पतसंस्थांना नवसंजीवनी देणार मावळमधील विचार मंथन शिबिर

पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील स्नेह रिसॉर्ट येथे दोन दिवसीय विचारमंथन शिबिर सहकारमय वातावरणात संपन्न झाले. राज्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध मागण्यांवर चर्चा होऊन अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या शिबिरातून घेण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन सहकार आयुक्त मा. दीपकजी तावरे यांच्या शुभहस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करून झाले. यावेळी सहकार देवतेच्या रूपात पतसंस्था चळवळीतील तरुणींनी सहभाग घेतला. उद्घाटन प्रसंगी माजी सहकार आयुक्त मा. शैलेशजी कोतमिरे, जिल्हा उपनिबंधक मिलिंदजी सोबले, बुलढाणा अर्बन संस्थापक तथा पतसंस्था चळवळीचे आधारस्तंभ राधेश्यामजी चांडक (भाईजी), महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा यांच्यासह राज्य फेडरेशनचे संचालक उपस्थित होते.

या दोन दिवसीय विचार मंथन शिबिरात अनेक मागण्यांबाबत सहकार आयुक्त दिपकजी तावरे यांनी सहमती दर्शवून परिपत्रकाद्वारे तातडीने सुधारणा करण्याची घोषणा केली. तसेच राज्य फेडरेशनच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी सहकार चळवळ बळकट करण्यासाठी राज्य फेडरेशनने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त केलेल्या उपक्रमांचा गौरव केला.

राधेश्यामजी चांडक यांनी सहकार खात्याने धाडसी निर्णय घेतल्यास पतसंस्थांना नवसंजीवनी मिळू शकते, असे प्रतिपादन केले. त्यांनी बुलढाणा अर्बन हे यशस्वी उदाहरण असल्याचे नमूद केले.

शिबिरात सहभागी सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून सहकारी पतसंस्थांच्या विविध मागण्या व प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. प्रत्येक गटाने सहकारी पतसंस्थांच्या विविध मागण्या व प्रश्नांबाबत अहवाल तयार करून त्यात सुधारणा सुचविल्या. दुसऱ्या दिवशी गटांनी तयार केलेले अहवाल सहकार अधिकाऱ्यांसमोर सादर करून त्यावर सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यात बदल सुचवत अंतिम दस्तऐवज तयार करण्यात येणार आहे.

हा अंतिम अहवाल तयार करुन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने सहकार आयुक्त लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असून, त्यात शासनाच्या सहकार विभागामार्फत आवश्यक ते कायदे बदल करून राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीला नवी दिशा मिळेल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी व्यक्त केला.

2/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 2 7 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे